
ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळ; तीन उपकेंद्रांमध्ये विविध पदांची निर्मिती
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील पेमगिरी, कुरकुंडी आणि कोठे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी नवीन पदनिर्मितीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार, तत्पर आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आमदार अमोल खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, राज्य शासनाने ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित तसेच श्रेणीवर्धित प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत संगमनेर तालुक्यातील पेमगिरी, कुरकुंडी आणि कोठे बुद्रुक या उपकेंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

या उपकेंद्रांमध्ये आवश्यक पदनिर्मिती करण्याबाबत आमदार खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले होते. ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या, आरोग्य सुविधांची गरज आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणी याकडे लक्ष वेधत त्यांनी या विषयाचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या मागणीची दखल घेत राज्य शासनाने पेमगिरीसाठी १५, तर कुरकुंडी आणि कोठे बुद्रुक या उपकेंद्रांसाठी प्रत्येकी ४ पदांना मंजुरी दिली आहे.
मंजूर पदांमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यक परिचारिका, औषध निर्माता, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्त्री व पुरुष आरोग्य सहाय्यक, परिचर, वाहनचालक तसेच सफाईगार आदी पदांचा समावेश आहे.या पदभरतीमुळे उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून नागरिकांना विविध आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच मिळण्यास मदत होणार आहे.
या निर्णयामुळे पेमगिरी, कुरकुंडी, कोठे बुद्रुक तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.दरम्यान, या मागणीला मंजुरी दिल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले आहेत.








