
संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत एका खाजगी व्यक्तीला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. नितीन किसन खर्डे (वय ३८, रा. चंदनापुरी शिवार, ता. संगमनेर) असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे….

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जेसीबी मशीनद्वारे शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू होते. यावेळी नितीन खर्डे यांनी तक्रारदार व तलाठी यांना बोलावून घेतले. त्यानंतर मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यासोबत कामकाजाबाबत चर्चा झाली.त्यानंतर तक्रारदार तलाठी कार्यालयाबाहेर जात असताना नितीन खर्डे यांनी शेतजमीन सपाटीकरणाचे काम करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांसाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकारानंतर तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

कारवाईदरम्यान नितीन खर्डे यांनी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई पथकात पोलीस कर्मचारी सहभागी होते.दरम्यान, या कारवाईनंतर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी संगमनेर शासकीय विश्रामगृह परिसरात दाखल झाले. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भरत डांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांनी संगमनेर येथे भेट देऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास तात्काळ एसीबीशी संपर्कप साधावा…







