
संगमनेर प्रतिनिधी : आमदार अमोल खताळ यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या समवेत झालेल्या या बैठकीत प्रकल्पामुळे नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाला मिळणाऱ्या चालनेबाबत तसेच नागरिकांच्या अपेक्षांबाबत चर्चा झाली.
यावेळी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित संरेखनामुळे खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) संदर्भात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला होत असलेला विलंब याकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. या प्रकल्पाबाबत संबंधित जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये मोठ्या अपेक्षा असून, हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशी लोकभावना असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे.
ही समिती रेल्वे मार्गाच्या संरेखनाचा आणि GMRT वर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी व्यक्त केली. यामुळे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली असून, हा बहुप्रतीक्षित प्रकल्प आता मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे मानले जात आहे.कोट -“पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा केवळ रेल्वे प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे. या प्रकल्पामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीमुळे प्रकल्पासंदर्भातील तांत्रिक मुद्द्यांवर योग्य तो तोडगा निघेल, असा विश्वास आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा बहुप्रतीक्षित प्रकल्प लवकरच मार्गी लागेल आणि नाशिक, अहिल्यानगर, पुणे तसेच संगमनेर परिसरातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण होईल…..





