
नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त देशभर विविध उपक्रम, साहित्यप्रकाशन आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा संगमनेरचे सुपुत्र श्याम जाजू लिखित ‘RSS@100 : एक सदी संकल्प की’ या हिंदी व इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतील उपराष्ट्रपती भवनात संपन्न झाले…
या पुस्तकाचे लोकार्पण भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते तसेच या समारंभास दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, ज्येष्ठ पत्रकार व इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष पद्मश्री रामबहादुर राय, पंचायती निरंजन आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद गिरीजी महाराज तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय संघचालक पवन जिंदल हजर होते…
RSS@100 : एक सदी संकल्प की’ या पुस्तकामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा, संघाच्या कार्याचा, विविध आव्हानांचा, सामाजिक योगदानाचा आणि भविष्यातील संकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वयंसेवक म्हणून झालेल्या प्रवासाचाही स्वतंत्र अध्याय या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे…
हे पुस्तक प्रभात प्रकाशन यांनी प्रकाशित केले असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील एक महत्त्वपूर्ण प्रकाशन म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. संगमनेरचे सुपुत्र श्याम जाजू यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे संगमनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे….






