
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आयान तांबोळीची उत्तुंग भरारी..
संगमनेर/(शौकत पठाण): जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनत असेल तर गरिबी कधीच ध्येयाच्या आड येत नाही, हे संगमनेर येथील एका सामान्य पावभाजी विक्रेत्याच्या मुलाने सिद्ध करून दाखवले आहे. कौटुंबिक आणि आर्थिक अडचणींचा डोंगर समोर असतानाही, संगमनेरच्या मोमीनपुरा भागातील रहिवासी आयान इक्बाल तांबोळी या तरुणाने नीट (NEET) परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत ‘एमबीबीएस’ (M.B.B.S.) या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.कष्टाचे चीज अन् पोटाला चिमटा काढून उभारलेले स्वप्नअनेकदा गरिबीमुळे मुलांनी बापाचाच पारंपरिक व्यवसाय पुढे चालवावा किंवा कुठे तरी मोलमजुरी करावी, अशी परिस्थिती निर्माण होते.
मात्र, संगमनेरमधील ‘बॉम्बे पावभाजी’चा छोटा स्टॉल चालवणारे इक्बाल भिकन तांबोळी यांनी या परंपरेला छेद देण्याचे ठरवले. कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह एका लहानशा स्टॉलवर अवलंबून असतानाही, मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून, आर्थिक चणचणीचा सामना करत त्यांनी आयानच्या शिक्षणात कधीही खंड पडू दिला नाही.बापाच्या घामाची जाण अन् आयानचे यशवडिलांचे काबाडकष्ट डोळ्यांसमोर पाहणाऱ्या आयाननेही या संघर्षाची पूर्ण जाणीव ठेवली. बारावी विज्ञान शाखेत ६५% गुण मिळवल्यानंतर त्याने आपलं पूर्ण लक्ष वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेवर केंद्रित केले.
दिवस-रात्र एक करून केलेल्या मेहनतीच्या जोरावर त्याने ‘नीट’मध्ये ५१३ गुण मिळवले. त्याचा ऑल इंडिया रँक ७३,६४० तर महाराष्ट्र रँक ५,६३० आला. या उत्तम गुणांच्या बळावर त्याला धुळे येथील नामांकित ‘अण्णासाहेब चुडामल पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज’ (ACPM) येथे एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला आहे.आयानच्या या यशात नॅशनल नीट प्रोग्रामचे इनचार्ज श्री. नाझिम तांबोळी सर आणि सहकारी श्री. अतिक इनामदार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या अभूतपूर्व यशाबद्दल नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे शाळेचे इनचार्ज श्री. नाझिम तांबोळी सर, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आयान व त्याच्या पालकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भावुक वातावरणात नागरी सत्कार करण्यात आला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
परिस्थितीला दोष देणाऱ्यांसाठी एक दीपस्तंभआजच्या काळात अनेक तरुण सोयी-सुविधांचा अभाव किंवा आर्थिक टंचाईचे कारण सांगून माघार घेतात. अशा वेळी आयान तांबोळी आणि त्याच्या पालकांचा हा प्रवास प्रत्येकाचे डोळे उघडणारा आहे. गरिबी कितीही असो, मुलांच्या शिक्षणात केलेली गुंतवणूक हीच भविष्यातील सर्वात मोठी पुंजी असते.
स्वतः सोयी-सुविधांपासून वंचित राहूनही मुलाच्या स्वप्नांना पंख देणारे इक्बाल तांबोळी आज समाजोपयोगी पालकत्वाचे उत्तम उदाहरण ठरले आहेत. यश हे सुविधांवर नाही, तर तुमच्यातील जिद्द आणि ‘चिकाटी’वर अवलंबून असते. वडिलांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाची जाणीव ठेवून ज्या वेळी एखादा मुलगा अभ्यास करतो, तेव्हा त्याला डॉक्टर होण्यापासून किंवा यश मिळवण्यापासून कोणतीही गरिबी रोखू शकत नाही.आयानचा हा प्रवास केवळ एका कुटुंबाचे यश नसून, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यासाठी एक प्रेरणादायी संदेश आहे.








